ताजा खबरभारतमहाराष्ट्र

भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण तर वैश्विक ज्ञानाचे भारतीयकरण आवश्यक- मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस

पत्रकार पंकज जोशी नागपुर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
जनसंपर्क विभाग
………………………………………………………

भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण तर वैश्विक ज्ञानाचे भारतीयकरण आवश्यक- मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस

-विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण विषयावर महाराष्ट्र ज्ञानसभेचे आयोजन

नागपूर : (४-४-२०२६)

भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण तर वैश्विक ज्ञानाच्या भारतीयकरणातून विकसित भारत २०४७ चे ध्येय साकार करावयाचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या सभागृहात महाराष्ट्र ज्ञानसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, भारतीय प्रबंध संस्थान, शिक्षण संस्कृती उत्थान न्यास नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र ज्ञानसभेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन करीत होते.
‘विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ विषयावर आयोजित महाराष्ट्र ज्ञान सभेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, अध्यक्षस्थानी शिक्षण संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव श्री. अतुल कोठारी, माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, व्हीएनआयटी शासी मंडळ अध्यक्ष डॉ. मदभूषी मदन गोपाल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मा. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, भारतीय प्रबंध संस्थान नागपूरचे संचालक डॉ‌. भीमराया मेत्री, व्हीएनआयटी संचालक डॉ. प्रेम लाल पटेल, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष डॉ. रवलीनसिंह खुराना यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा आधुनिक वैश्विक ज्ञान समरसतेतून शाश्वत ज्ञानाच्या माध्यमातून जीवनपद्धती प्रवाहित करीत येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवायचे कार्य करायचे असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले. आपला इतिहास स्वर्णीम होता, जगात कोठेही विद्यापीठाची संकल्पना नसताना भारतात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, काशी आदी जगमान्य विश्वविद्यालय होते. या विश्वविद्यालयांमध्ये खगोल, भूगोल, शल्यचिकित्सा, विज्ञान, व्याकरण, आर्किटेक्ट सर्व प्रकारच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञान येथे मिळत होते, यावरून आपण किती ज्ञान समृद्ध होतो, असे चिनी पर्यटकाने लिहिलेल्या साहित्यातून दिसून येते, असे श्री. फडणवीस म्हणाले. केवळ इतिहास सांगून आपण महान होऊ शकत नाही, तर इतिहास व वर्तमानाला एकत्रित करून भविष्याचा सामना करावा लागतो. आपला स्वर्णीम इतिहास वैश्विक आव्हानाचा सामना करण्यासाठी धैर्य देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. जगाच्या विकासाची गती लक्षात घेतली तर प्रथम औद्योगिक क्रांती १७६० मध्ये झाली, दुसरी औद्योगिक क्रांतीत ८० वर्षाचे अंतर होते तर तिसरी औद्योगिक क्रांती येण्यास २५० वर्षाचा कालावधी लागला. चौथी व पाचवी औद्योगिक क्रांतीची सुरुवात २०१० ते २०२० दरम्यान झाली असून जग सहाव्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आहे. अलीकडच्या तीन औद्योगिक क्रांती केवळ १५ वर्षात झाल्या असून जग गतीने पुढे जात आहे, आपण समजून घेतले नाही तर मागे राहू. ४-५-६ व्या औद्योगिक क्रांतीला गती देणारे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता सृजन करण्यात विश्वासार्ह ठरले. जगाच्या पाठीवर या औद्योगिक क्रांतीत भारतीय वंशातील नागरिकांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे भविष्यातील आव्हाने आपणास समजून घ्यावी लागतील. त्यानुसार शैक्षणिक धोरण, मानव संसाधन तयार करावे लागणार आहे. नैतिक तसेच व्यवसाय गुण निर्माण करणारे शैक्षणिक धोरण असावे. शिक्षणातून बौद्धिक, भावनिक, नैतिक क्षमतेसोबतच व्यावसायिक क्षमता निर्माण झाल्यास देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारी पिढी निर्माण होईल. विकसित भारत- विकसित महाराष्ट्र अशा दोन उद्दिष्ट पूर्तीसाठी शिक्षण क्षेत्र कशा प्रकारे योगदान करेल, याचे मंथन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय ज्ञान परंपरेला आजच्या शिक्षण प्रणालीत समन्वय साधत नवीन शैक्षणिक धोरण (NEP2020) पुढे न्यावे लागेल. विविध क्षेत्र कसे बदलेल, विकास कसा होईल, नवीन समाज निर्माण होईल, या दिशेने शिक्षणाचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. या दृष्टीने शिक्षकांनी कालबाह्य झालेल्या अभ्यासक्रमात बदल करित वर्तमान शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेला अभ्यासक्रम तयार करावा, त्याकरीता शिक्षकांना देखील प्रशिक्षित व्हावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

विद्यापीठांनी तयार करावा कृती आराखडा – डॉ. प्रशांत नारनवरे

विकसित महाराष्ट्राचे ध्येय प्राप्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. यावेळी त्यांनी दावोस येथे झालेले सामंजस्य करार, परकीय विद्यापीठांची स्थापना करण्यासाठी मुंबईत सरकारने ३०० एकर जमीन दिली, याबाबत माहिती दिली. कुशल मनुष्यबळ निर्मितीतून महाराष्ट्राला विकसित करण्याचे कार्य आपणास करावयाचे असल्याचे डॉ. नारनवरे म्हणाले.

भारतीय ज्ञानपरंपरा परिवर्तनाचे माध्यम – श्री. अतुल कोठारी

भारतीय ज्ञानपरंपरा परिवर्तनाचे माध्यम बनेल, असे प्रतिपादन शिक्षण संस्कृती उत्थान न्यास दिल्लीचे राष्ट्रीय सचिव श्री. अतुल कोठारी यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरेच्या आधारे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल अपेक्षित आहे. विकसित भारत विकसित महाराष्ट्रासाठी शैक्षणिक धोरण आणि वित्त धोरण सर्वात महत्त्वाचे असून या ध्येयपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटक सहभागी झाल्यास विकसित भारत निर्माण होईल, असे श्री कोठारी म्हणाले. संशोधनाशिवाय कोणताही देश विकास करू शकत नाही. त्यामुळे आपल्या संशोधकांनी संशोधनाची दिशा बदलावी लागेल. समाजाच्या सर्व घटकातील भागीदारी वाढवावी लागेल, असे श्री. कोठारी म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने प्राथमिक शिक्षणापासून भारतीय ज्ञान परंपरा शिकविण्यास प्राधान्य दिले आहे, असे असताना उच्च शिक्षणातील संस्थांची यात महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे श्री. कोठारी म्हणाले. यावेळी त्यांनी ज्ञान सभेचे महत्त्व पटवून दिले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरातनंतर सहावी ज्ञानसभा महाराष्ट्रात होत आहे. केरळ येथे घेतलेल्या प्रथम ज्ञान सभेविषयी त्यांनी माहिती दिली.

स्वागतपर भाषण करताना व्हीएनआयटी संचालक डॉ. प्रेम लाल पटेल यांनी ज्ञान ही शक्ती असल्याचे सांगितले. विकसित भारताच्या दिशेने एनइईपी महत्त्वपूर्ण पाऊल असून ज्ञान सभेच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र ज्ञान सभेच्या स्मरणिकेचे आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार माननीय कुलगुरू डॉ. मनाली सिरसागर यांनी मानले तर संचालन डॉ. कल्याणी काळे व डॉ. चिन्मयी निमखेडकर यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चारही शिक्षण संस्थेतील प्राधिकारणी सदस्य, विविध विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, संशोधक तसेच देशाच्या विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

मा. संपादक / मुख्य प्रतिनिधी
मा. महोदय,
आपणांस विनंती करण्यात येते की, सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून कृपया प्रसिद्धी द्यावी, ही विनंती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button