जागतिक जल दिन 2026’ निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व जल जनजागृती उपक्रम
पत्रकार पंकज जोशी नागपुर

नागपूर महानगरपालिका, नागपूर
(जनसंपर्क विभाग)
ता. 01 एप्रिल 2026.
जागतिक जल दिन 2026’ निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व जल जनजागृती उपक्रम
नागपूर, ता.०१ : जागतिक जल दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटद्वारा जल है तो कल है या संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ५ संघांनी सहभाग नोंदविला. पाणी संवर्धनाचे महत्त्व, जलस्रोतांचे संरक्षण आणि पाण्याचा योग्य वापर याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ग्रुप ए – टीम जल रक्षक (Team Jal Rakshak), ग्रुप बी – टीम नीर शक्ती (Team Neer Shakti), ग्रुप सी – टीम जल मित्र (Team Jal Mitra), ग्रुप डी – टीम अक्वा वॉरियर्स (Team Aqua Warriors), ग्रुप E – टीम वॉटर गार्डियन्स (Team Water Guardians) अशा चार चमूने सहभाग नोंदविला. यासोबतच वॉटर वीक सेलिब्रेशन अंतर्गत नागपूर शहरातील विविध शाळांमध्ये जल संवर्धनाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत एमएसयुचे सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथून खेरडे व अन्न सुरक्षा तज्ञ डॉ. अनुजा मैत्रेय यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर व जलस्रोतांचे संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमास नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती श्रीमती. मनीषा अतकरे तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती. वसुमना पंत यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या विविध झोनमधील शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये वाल्मिकी गांधी नगर शाळा, येंडावडी शाळा, कपिल नगर शाळा , शास्त्री नगर माध्यमिक शाळा, गायत्री कॉन्व्हेंट शाळा आणि जयताळा शाळा या शाळांचा समावेश होता.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये “जल है तो कल है ” हा संदेश रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच सर्व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व जलस्रोतांचे संरक्षण करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अन्न सुरक्षा तज्ञ डॉ. अनुजा मैत्रेय यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. शुशांकी कापसे, प्रशासकीय अधिकारी डॉ. सोनल संघी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सनी मगर, तांत्रिक अधिकारी हर्ष चंदेल, संशोधन सहाय्यक कु.अश्विनी पटेल, संवाद तज्ञ श्री. स्नेहल करंजेकर, डेटा व्यवस्थापक श्रीमती. हेमाक्षी वानखेडे, बहुउद्देशीय सहाय्यक श्री. नाशिक वालोदे उपस्थित होते.




